प्रतिनिधी मुंबई :
मुंबई महानगरपालिकेच्या कांदिवली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील कंत्राटी कामगारांच्या वेतनाच्या पारदर्शकतेसंदर्भात कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी रुग्णालयाचे उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय घनश्याम गुप्ता यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी ‘आरटीआय ह्यूमन राईट्स ॲक्टिव्हिस्ट असोसिएशन’चे (RTI Human Rights Activist Association) कुर्ला तालुका प्रसिद्धी प्रमुख आदित्य मैराळे यांनी केली आहे.या संदर्भात त्यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीम. अश्विनी भिडे आणि विरोधी पक्ष नेत्या श्रीम. किशोरीताई पेडणेकर यांना निवेदन दिले असून, त्याची प्रत महापौर श्रीम. रितू तावडे आणि प्रमुख कामगार अधिकारी यांनाही पाठवली आहे.
नेमके प्रकरण काय?
कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात बाह्य कंत्राटदारामार्फत बहुउद्देशीय कामगार, सफाई कामगार, रजिस्टर असिस्टंट आणि सुरक्षा असिस्टंट या पदांवर कंत्राटी मनुष्यबळ कार्यरत आहे.कंत्राटी कामगार (नियमन व निर्मूलन) कायदा १९७० मधील नियम १९७१ चे कलम ८१(१)(i) आणि ‘वेजेस कोड २०१९’ (Wages Code 2019) चे कलम ५० नुसार, मुख्य नियोक्ता म्हणून कामगारांच्या वेतनाची संपूर्ण माहिती दर्शवणारा सूचना फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे.
मागणी करूनही दुर्लक्ष कारण काय?; यापूर्वी 'बहुजन मुक्ती पार्टी'तर्फे ६ ऑगस्ट २०२६ रोजी पत्र देऊन असा सूचना फलक लावण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, रुग्णालय प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. कामगारांना लागू असलेले प्रवर्गनिहाय किमान वेतन (मूळ वेतन व विशेष भत्ता), घरभाडे भत्ता, पीएफ (PF), ईएसआयसी (ESIC), बोनस, रजा रोखीकरण आणि प्रत्यक्ष बँकेत जमा होणारा पगार याबाबत कोणतीही पारदर्शकता ठेवली जात नसल्याने कामगारांमध्ये संभ्रम व शंका निर्माण होत आहेत.
प्रमुख मागण्या:
शासकीय नियमांचे जाणूनबुजून उल्लंघन केल्याप्रकरणी उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय घनश्याम गुप्ता यांच्यावर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करावी आणि जुलै ते डिसेंबर २०२६ या सहामाहीतील सुधारित किमान वेतन तक्त्यानुसार (कुशल, अर्धकुशल व अकुशल) आणि कामगारांच्या सर्व वैधानिक लाभांची माहिती देणारा फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावण्याची मागणी केली असली तरी आयुक्तांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










