मुंबई, प्रतिनिधी :
“आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन” तर्फे दिनांक ११ जून २०२६ रोजी आयोजित पत्रकार परिषदेला पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. १६ जून २०२६ रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर होणाऱ्या “RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन” संदर्भात ही पत्रकार परिषद घेण्यात आली.
साधारण एक तासासाठी नियोजित असलेली पत्रकार परिषद पत्रकारांच्या उत्सुकतेमुळे आणि सखोल चर्चेमुळे तब्बल दोन तासांहून अधिक काळ चालली. RTI संरक्षण, भ्रष्टाचारविरोधी लढा, कार्यकर्त्यांचे संरक्षण, प्रशासनातील पारदर्शकता आणि लोकशाही मूल्यांचे जतन या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. राजेश माकोडे यांनी केंद्र सरकारने प्रस्तावित केलेल्या नवीन RTI अधिनियम २०२६ बाबत सविस्तर माहिती दिली. या नव्या कायद्यामुळे माहिती अधिकाराच्या मूळ उद्देशालाच धक्का बसण्याची भीती व्यक्त करत त्यांनी नागरिक, पत्रकार आणि RTI कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन याला विरोध करण्याचे आवाहन केले. पत्रकार परिषदेत असोसिएशनच्या वतीने जनहिताशी निगडित विविध महत्त्वपूर्ण मागण्या, आगामी आंदोलनाची भूमिका तसेच RTI, भ्रष्टाचारविरोधी लढा आणि सामाजिक न्यायासाठीच्या उपक्रमांची सविस्तर माहिती पत्रकारांसमोर मांडण्यात आली.
यावेळी संस्थेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष श्री. कामेश घाडी यांनी अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कथितरीत्या केलेल्या “बेरोजगार तरुण झुरळांसारखे आहेत; ते माध्यम, सोशल मीडिया आणि RTI कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करतात” या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. हे वक्तव्य देशातील लाखो बेरोजगार युवक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि RTI चळवळीशी संबंधित नागरिकांचा अपमान करणारे असल्याचे सांगत संघटनेतर्फे निषेधाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले.
तसेच NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि परीक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटींबाबत संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री श्री. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
पत्रकार परिषदेत RTI कार्यकर्त्यांवरील वाढते हल्ले, धमक्या, खोटे गुन्हे, मानसिक छळ, माहिती आयोगातील रिक्त पदे, माहिती देण्यात होणारा विलंब, वाढता भ्रष्टाचार आणि नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांवर होत असलेले आघात या विषयांवरही चिंता व्यक्त करण्यात आली.
१६ जून २०२६ रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर होणाऱ्या RTI संरक्षण धरणे व भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलनात पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले.
या पत्रकार परिषदेला संस्थेचे खालील पदाधिकारी उपस्थित होते :
◾ श्री. कामेश घाडी – राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष
◾ श्री. राजेश माकोडे – राष्ट्रीय उपाध्यक्ष
◾ श्री. बसंत चक्रवर्ती – राष्ट्रीय सचिव
◾ सौ. जयश्री मिनेश शाह – राष्ट्रीय महिला अध्यक्षा
◾ श्री. रवींद्र जाधव – राष्ट्रीय प्रेस मीडिया अध्यक्ष
◾ श्री. राजू केदारे – महाराष्ट्र राज्य अध्यक्ष
◾ श्री. सावन ससाणे – महाराष्ट्र राज्य सचिव
◾ श्री. सचिन खरात – मुंबई जिल्हा अध्यक्ष
◾ डॉ. फहीम शेख – मुंबई जिल्हा सचिव
पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकारांनी विविध विषयांवर प्रश्न उपस्थित केले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सविस्तर उत्तरे देत आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. RTI, भ्रष्टाचारविरोधी लढा आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी संघटना रस्त्यावर उतरली असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
“RTI वाचवा – लोकशाही वाचवा – भ्रष्टाचार हटवा” या घोषवाक्यासह येत्या आंदोलनाची दिशा आणि भूमिका पत्रकार परिषदेत मांडण्यात आली.




















