मुंबई | प्रतिनिधी
मुंबई : कुर्ला येथील खान बहादूर भाभा रुग्णालयात कंत्राटी कामगारांच्या वेतनासंदर्भातील माहिती सूचना फलकावर अपूर्ण व अर्धवट स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्याकडे लेखी तर मुख्यमंत्री , राज्यपाल , कामगार मंत्री यांच्या कडे इ मेल द्वारे तक्रार दाखल करून रुग्णालयाचे मनोज वर्मा यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. बहुजन मुक्ती पक्षाचे मुंबई प्रदेश महासचिव आदित्य मैराळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कंत्राटी कामगारांच्या वेतना संदर्भातील आवश्यक वैधानिक माहिती रुग्णालयाच्या दर्शनी भागात स्पष्टपणे उपलब्ध करून देण्याची मागणी यापूर्वी १३ मे २०२६ रोजी करण्यात आली होती. केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या उपलब्ध नियमांनुसार, Contract Labour (Regulation and Abolition) Central Rules, 1971 मधील Rule 81(1)(i) अंतर्गत वेतनाचे दर, कामाचे तास, वेतन कालावधी, वेतन देण्याची तारीख तसेच संबंधित निरीक्षकाची माहिती दर्शनी भागात प्रसिद्ध करण्याची तरतूद आहे. तसेच Code on Wages, 2019 च्या कलम 50(2) मध्ये आस्थापनेच्या प्रमुख ठिकाणी श्रेणीनुसार वेतनदर, वेतन कालावधी, वेतन देण्याची तारीख व वेळ आणि संबंधित Inspector-cum-Facilitator यांची माहिती असलेली सूचना प्रसिद्ध करण्याची तरतूद आहे. आदित्य मैराळे यांचा आरोप आहे की, महानगरपालिका कंत्राटी कामगारांच्या वेतनात ४९.५८% वैधानिक निधी देत असताना फलकावर PF, ESIC, बोनस, सार्वजनिक सुट्ट्यांची रक्कम , बोनस आणि इतर वैधानिक लाभांबाबतची आवश्यक माहिती पूर्णपणे का उपलब्ध नाही ? रुग्णालयाचे डॉ. मनोज वर्मा यांच्यावर जाणूनबुजून कंत्राटी कामगारांकडून माहिती लपवण्याचा आणि कामगारांच्या वेतनात भ्रष्टाचार करण्याचा हेतू असल्याशिवाय वेतनाची माहिती उघड न करण्याचे कारण काय ? नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. शासनाचे कायदे , नियम , कामगारांचे मूलभूत अधिकार मान्य नसताना शासनाचा पगार घेणे चुकीचे असल्याने नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करून तत्काळ निलंबनाचा निर्णय घ्यावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.









