रेड (ता. शिराळा) येथील नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन; तात्काळ कारवाईची मागणी
शिराळा, प्रतिनिधी :
शिराळा-ईश्वरपूर राज्य महामार्गालगत रेड गावाजवळील साईटपट्टी परिसरात आरएमसी (RMC) प्लांटच्या वाहनचालकांकडून सर्रासपणे रस्त्याच्या कडेला तसेच गटरांमध्ये कॉंक्रीट टाकले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या बेजबाबदार कृत्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून भविष्यात मोठ्या अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्य महामार्गाच्या कडेला आणि दुतर्फा असलेल्या गटरांमध्ये कॉंक्रीट टाकल्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडथळला जाण्याची भीती आहे. परिणामी सांडपाणी साचून डासांची पैदास वाढण्याची शक्यता असून मलेरिया, डेंग्यू यांसारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो, अशी चिंता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रेड गावातील जागरूक युवकांनी शिराळा तहसीलदार यांना निवेदन सादर केले. यावेळी श्री. विक्रम सातपुते, श्री. अरविंद सातपुते, श्री. अक्षय सातपुते यांच्यासह स्थानिक युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
निवेदनाद्वारे संबंधित वाहनचालकांवर तसेच जबाबदार घटकांवर शासनाच्या नियमांनुसार तात्काळ कारवाई करण्यात यावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
स्थानिक नागरिकांच्या आरोग्याचा, सुरक्षिततेचा आणि पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
— प्रतिनिधी, प्रशांत गलुगडे रा. रेड, ता. शिराळा, जि. सांगली












