देशभरात शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. हे आंदोलन चिरडण्यासाठी केंद्र सरकार वेगवेगळे प्रयत्न करत असले तरी शेतकऱ्यांचा हा लढा सुरूच राहील. समाजवाद ही काळाची गरज आहे असे वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केले.
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन यांच्या वतीने रोटरी क्लब ऑफ नाशिक संस्थेच्या सभागृहात वीज कामगार मेळावा आणि कॉम्रेड माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी मेधा पाटकर बोलत होत्या. यावेळी पाटकर यांच्या हस्ते वीज कामगार नेते वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष मोहन शर्मा यांना माधवराव गायकवाड बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस शेतकरी आंदोलनातील शहीद, लखीमपूर येथील शेतकरी शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. केंद्र सरकारवर टीका करताना पाटकर म्हणाल्या की, ‘शेतकरी विरोधी कायदे व प्रस्तावित वीज बिल कायदा रद्द करण्यासाठी संघर्ष सुरू आहे. शेतकरी, कामगार विरोधी धोरणविरोधात लढाई करावी लागेल. चहा विकणारे विमा, रेल्वे, विमान कंपन्या विकत आहे. फक्त पंतप्रधानांची खुर्ची विकायचे शिल्लक ठेवले आहे. ही २०२४ च्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. या लढ्यात शेतकरी जिंकला तरच देशातील शेतकऱ्यांसह कामगार वाचेल. यासाठी शेतकऱ्यांनी संघटितपणे प्रयत्न करावा’, असे आवाहन मेधा पाटकर यांनी केले.