पुट्टपर्थी : आपण घेतलेले निर्णय चांगले आहेत अथवा नाही, याचे , आत्मपरीक्षण राज्यकर्त्यांनी दररोज करावे तसेच आपल्यात काही अवगुण आहेत का, हेदेखील त्यांनी तपासले पाहिजे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा यांनी आज सोमवारी केले. ते येथील श्री सत्यसाई इन्स्टिट्यूट ऑफ हायर लर्निंगच्या ४० व्या दीक्षान्त सोहळ्याला संबोधित करीत होते.
लोकशाही व्यवस्थेतील सर्वच राज्यकर्त्यांनी आपली दररोजची कामे सुरू करण्यापूर्वी आपल्यात काही अवगुण आहेत, का हे तपासले पाहिजे. राज्यकर्त्यांमध्ये १४ अवगुण असतात, या अवगुणांपासून त्यांनी दूर राहिले पाहिजे, असे रामण्णा यांनी महाभारताचा दाखला देताना सांगितले. सध्या न्याय्य प्रशासन देण्याची गरज असून, ते नागरिकांच्या गरजेप्रमाणे असावे. येथे अनेक ज्ञानी लोक आहेत. तुम्ही जगभरात घडणाऱ्या घडामोडी पाहात आहात. लोकशाहीत नागरिकच सर्वोच्च असतात. सरकारने घेतलेल्या निर्णयांचा फायदा त्यांना झाला पाहिजे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
देशातील सर्वच व्यवस्था स्वतंत्र आणि प्रामाणिक असाव्यात, पण दुर्दैवाने आधुनिक शैक्षणिक व्यवस्था केवळ उपयुक्त असलेल्या कार्यांवरच विद्यार्थ्यांचे लक्ष केंद्रित करते. विद्याथ्यांचे चारित्र्य घडेल आणि त्यांना सामाजिक व जबाबदारीची जाणीव होईल, यासाठी अशी व्यवस्था शिक्षणाच्या नैतिक आणि आध्यात्मिक पैलूला सामोरे जाण्यासाठी सुसज्ज नाही, असे रामण्णा यांनी सांगितले.
नैतिक मूल्ये, नम्रतेचे गुण, शिस्त, निःस्वार्थता, करुणा, सहिष्णुता, क्षमा आणि परस्परांचा आदर शिकवणारेच खरे शिक्षण असते. असे रामण्णा यांनी सांगितले.