एकूण २.८४ लाख गुन्हे | राज्यात जवळपास ८० हजार गुन्हे. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्यूरोच्या (एनसीआरबी) ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात रेल्वेशी संबंधित गुन्ह्याचे एकूण ७९,७२३ प्रकरणे दाखल झाली.
कोरोना काळात २०२० मध्ये रेल्वे सेवा मर्यादित करण्यात आल्या होत्या. तरीही देशभरात रेल्वेशी संबंधित २.८४ लाखांपेक्षा अधिक गुन्हे नोंद झाले आहेत. यातील सर्वाधिक जवळपास ८० हजार प्रकरणे महाराष्ट्रात दाखल झाली आहेत.
राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्यूरोच्या (एनसीआरबी) ताज्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात रेल्वेशी संबंधित गुन्ह्याचे एकूण ७९,७२३ प्रकरणे दाखल झाली. यातील ६८,२१५ रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ) आणि ११,५०८ प्रकरणे गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस (जीआरपी) यांनी दाखल केले.
आरपीएफकडून दाखल एकूण ६८,२१५ प्रकरणात ६८,२७६ लोकांना अटक करण्यात आली. मात्र, केवळ ६५,४६४ प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले. एकूण ६५,९९० लोकांना आरोपी बनविण्यात आले. रेल्वे प्रोटेक्शन फोर्सकडून करण्यात आलेल्या कारवाईत एकूण ६४,६४० प्रकरणात एकूण ६४,६८० लोकांविरुद्ध आरोप सिद्ध झाला. या काळात दाखल केलेल्या प्रकरणात ५५ टक्के गुन्हे दखलपात्र होते.
जीआरपीकडून राज्यात दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात ९ प्रकरणे बाल लैंगिक शोषणाचे आहेत. यातील एक प्रकरण अनुसूचित जाती आणि एक अनुसूचित जमातीच्या विरुद्धचे आहे. याशिवाय ५ प्रकरणे हत्या, ३ निष्काळजीपणामुळे मृत्यूचे आहेत. ६ प्रकरणे आत्महत्येचा प्रयत्न, ८ प्रकरणे हत्येचा प्रयत्न आणि ७ प्रकरणे मनुष्यवधाचे आहेत.