मुंबई प्रतिनिधी :
मुंबईतील धारावी भागातील संत शिरोमणी रोहिदास महाराज मार्ग हा चर्मकार समाजासाठी श्रद्धेचा प्रतीक आहे. या मार्गावरील नावफलकावर समाजाचे आद्य गुरु संत रविदास महाराज यांची प्रतिमा आहे. मात्र, या पवित्र स्थळी वारंवार राजकीय बॅनर लावून संत रविदास महाराजांचा अपमान केल्याचे प्रकार घडत आहेत.
या अपमानास्पद प्रकाराने समाजबांधवांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. ‘गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघ’ या संघटनेने याबाबत ठोस भूमिका घेतली. संस्थापक अध्यक्ष मा. दिपक खोपकर यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या प्रतिनिधींनी धारावी पोलीस ठाणे, बीएमसी जी नॉर्थ विभाग, आणि खासदार राहुल शेवाळे यांना निवेदन दिले. या निवेदनात या अपमानास्पद कृत्यांवर त्वरित कारवाईची मागणी करण्यात आली.
संघटनेच्या तक्रारीनंतर प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी भेट देऊन संबंधित बॅनर हटवले आणि दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन दिले. या वेळी महिला प्रदेश अध्यक्षा सौ. मनीषाताई ठवाळ, उपाध्यक्ष श्री. सुनील नेटके, प्रसिद्धी प्रमुख श्री. सचिन खरात आणि धारावी विभागातील इतर पदाधिकारी उपस्थित होते.
संघटनेच्या या ठोस भूमिकेमुळे प्रशासनाला सतर्क होण्यास भाग पाडले गेले. समाजातील संतापाला योग्य दिशा देत, अपमानास थांबवण्यासाठी या संघटनेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. या प्रकरणात ज्या अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई केली, त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
या घटनेने समाजाला आत्मसन्मानाचे महत्व पटवून दिले आहे. ‘गुरु रविदास स्वाभिमानी युवा संघ’ च्या या भूमिकेमुळे समाजातील अनेक घटकांनी एकत्र येऊन, पवित्र स्थळांच्या सन्मानासाठी लढण्याचा निर्धार केला आहे.