पुणे : बारामती शहर आणि परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या क्लासेस व अकॅडमींवर कारवाई करावी या मागणीसाठी आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशनचे एक्टिविस्ट मोहसीन पठाण यांनी गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे. मात्र प्रशासनाकडून या अकॅडमींवर कारवाईत उदासीनता दाखवली जात आहे. आमचा या अकॅडमींशी काही संबंध नाही असं म्हणत बारामतीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले आहेत. त्यामुळे आता या अकॅडमींवर कारवाई कोण करणार असा सवाल उपस्थित होत आहे.
बारामती शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे अकॅडमी सुरू झाल्या आहेत. मनात येईल तितके शुल्क आकारून विद्यार्थ्यांची पिळवणूक केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे. याबद्दल बारामतीतील राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसचे मोहसीन पठाण यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून शासन दरबारी पाठपुरावा केला. मात्र आजवर या अकॅडमींवर कोणतीच कारवाई झालेली नाही. उलट आर्थिक संगनमत करून काही अधिकाऱ्यांनी स्वत:चा स्वार्थ साधल्याचे प्रकार घडले आहेत.
बारामतीतील एकाही अकॅडमीचे फायर ऑडिट झालेले नाही. त्यामुळे उद्या एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे मोहसीन पठाण यांनी याबाबत बारामती नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रारही केली. मात्र त्यांच्याकडून नोटीसा काढण्यापलीकडे कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. शिक्षण विभागासह विविध शासकीय विभागांकडे याबाबत पाठपुरावा करूनही कारवाई होत नसल्याचे मोहसीन पठाण यांनी बारामतीतील प्रशासकीय भवनासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
याबाबत कारवाईस टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि संबंधित बेकायदेशीर क्लासेस आणि अकॅडमी बंद करून गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पठाण यांनी केली आहे. मात्र आता बारामतीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवत आमचा याच्याशी काही संबंधच नाही असा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे तीन उलटूनही या उपोषणाबाबत अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही. परिणामी या अकॅडमींवर कारवाई कोण करणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
अकॅडमींवर अधिकारीच मेहरबान..!
बारामतीतील बहुताश प्रशासकीय अधिकाऱ्यांचे या अकॅडमी आणि क्लासेस चालकांचे लागेबांधे असल्याची चर्चा आहे. त्यातूनच मोठ्या प्रमाणात तडजोड केली जात असून त्यामुळेच या अकॅडमी चालकांचे फावत आहे. विशेष म्हणजे अनेकदा तक्रारी केल्यानंतरही प्रशासनाने कारवाई करण्याऐवजी संबंधित अकॅडमी चालकांशी संगनमत केल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे कितीही तक्रारी होवू द्या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत अशीच भूमिका बारामतीतील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घेतल्याचे पाहायला मिळत आहे.