चेन्नई : मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश संजीव बॅनर्जी यांची मेघालयला बदली करण्यात आली. मात्र या निर्णयास मद्रास उच्च न्यायालयातील २००हून अधिक वकिलांनी विरोध दर्शविला आहे. त्यांनी तसे पत्र सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमला लिहिले आहे. अत्यंत कार्यक्षम न्यायाधीशांच्या बदलीमागचे कारण जाणून घेण्याचा वकिलांना अधिकार आहे, असेही या पत्रात नमूद केले आहे.
या पत्रात म्हटले आहे की, निर्भय व प्रामाणिक न्यायाधीशाची करण्यात आलेली बदली म्हणजे त्याला दिलेली एक प्रकारची शिक्षाच असते. या १२ पानी पत्रावर २७३ वकिलांनी सह्या केल्या आहेत. त्यात आर. वैगई, व्ही. प्रकाश, एनजीआर प्रसाद आदी ज्येष्ठ वकिलांचा समावेश आहे.
या पत्रात म्हटले आहे की, ७५ न्यायाधीशांच्या पदांची मंजुरी मिळालेल्या मद्रास उच्च न्यायालयातून, २०१३ साली स्थापन झालेल्या व सध्या अवघे दोनच न्यायाधीश असलेल्या मेघालय उच्च न्यायालयात न्या. संजीव बॅनर्जी यांची बदली झाली, एखाद्या ठिकाणचे प्रशासन सुधारावे, गतिमान व्हावे म्हणून बदली केली जाते; मात्र जिथे दरवर्षी ३५ हजार खटले दाखल होतात अशा मद्रास उच्च न्यायालयातून न्या.संजीव बॅनर्जी यांची मेघालयमध्ये का बदली केलीयामागचे कारण जाणून घेण्याचा वकिलांना हक्क आहे.