मुंबई प्रतिनिधी :
नवी दिल्ली :- अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना सीबीआयनं क्लीनचीट दिली आहे. त्यामुळं पटेल यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सीबीआयनं दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात याप्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला. त्यानंतर आता प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधातील ही केस बंद झाली आहे.
सन २०१७ मधील एका भ्रष्टाचार प्रकरणात प्रफुल्ल पटेल यांच्याविरोधात कोणताही सबळ पुरावा नसल्याचं सीबीआयनं कोर्टात सांगितलं आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री असताना प्रफुल्ल पटेल यांनी भ्रष्टाचार करुन कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. याप्रकरणी सीबीआयकडून तपास सुरु होता.
या प्रकरणी सीबीआयनं आता आपला क्लोजर रिपोर्ट दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात दाखल केला. पण जेव्हा प्रफुल पटेल हे शरद पवारांसोबत होते तेव्हा त्यांची याप्रकरणी चौकशी सुरु होती. पण आता ते अजित पवारांसोबत आहेत आणि अजित पवार हे भाजपसोबत आहेत. त्यामुळं त्यांना ही क्लनीचीट मिळाली असल्याची चर्चा रंगू लागली आहे.