सणासुदीच्या तोंडावर दरवाढीचा तडका
वृत्तसेवा दसरा आणि दिवाळी सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाच सामान्य नागरिकांना महागाईचा तडका बसणार आहे.
एकीकडे, पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सुरूच असताना, सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडर दरात १५ रुपयांची वाढ केली आहे. बुधवारपासूनच वाढलेले दर अंमलात येतील, असे तेल कंपन्यांकडून सांगण्यात आले आहे. ताज्या दरवाढीनंतर दिल्लीमध्ये १४.२ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरचे दर ८९९.५० रुपयांवर गेले आहेत. दुसरीकडे, ५ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरचे दर ५०२ रुपयांवर गेले आहेत. गत जुलै महिन्यापासून गॅस सिलिंडर दरात ९० रुपयांची वाढ झालेली आहे.
दिल्ली आणि मुंबईत गॅस सिलिंडरचे दर समान म्हणजे ८९९.५० रुपयांवर गेले असून, कोलकाता येथे हे दर ९२६ रुपयांवर गेले आहेत.
काही दिवसांपूर्वीच व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस सिलिंडरचा भाव वाढवला होता. एलपीजीचा भाव एकदोन रुपयांनी नव्हे, तर ४३.५० रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांची दुकाने, स्टॉल्स, हॉटेल्स, रेस्टॉरंट, धावे अशा सर्वांना झळ बसणार आहे. या सगळ्यांकडून खाद्यपदार्थाच्या किमती वाढवल्या गेल्यास त्याचा अंतिम फटका सामान्य नागरिकांनाच बसणार आहे. दिल्लीत व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजीसाठी १,७३६.५० रुपये मोजावे लागतील. यापूर्वी ही किंमत १,६९३ रुपये इतकी होती. तर कोलकातामध्ये हाच दर १,८०५ रुपये इतका झाला आहे.