इंधन दरवाढ आणि महागाई अशा दुहेरी संकटामुळे त्रस्त असलेल्या मुंबईकरांना आता आणखी एक धतका बसणार आहे. कारण बुधवारी मध्यरात्रीपासून मुंबईत CNG आणि पाईप गॅसच्या दरात वाढ होणार आहे. महानगर गैसकडून सीएनजी गॅसच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार CNG च्या दरात प्रतिकिलो 2 रुपये 58 पैसे आणि घरगुती गॅसच्या दरात प्रतियुनिट 55 पैशांची वाढ करण्यात आली आहे.
वाहतूक आणि अन्य खर्चात वाढ झाल्याने ही दरवाढ लागू करण्यात आल्याचे महानगर गॅसकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता मुंबईतील सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांच्या भाड्यातही वाढ होऊ शकते. तर दुसरीकडे घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने सामान्यांच्या घरातील बजेटही कोलमडणार आहे.
नये दर किती..?
महानगर गॅसच्या एक किलो सीएनजीसाठी आता 51.98 रुपये मोजावे लागतील. तर पाईप गॅसच्या स्लॅब । साठी 30.40 रुपये प्रतियुनिट आणि स्लॅब 2 साठी 36 रुपये प्रतियुनिट इतकी किंमत असेल. काही दिवसांपूर्वी पेट्रोलियम कंपन्यांकडून घरगुती गॅसच्या किंमतीत 25.50 रुपयांची वाढ करण्यात आली होती. तर व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरची किंमत 84 रुपयानी वाढली होती.
इंधन म्हणून सीएनजी स्वस्त
पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी हे इंधन स्वस्त आहे. मुंबईत सध्या एका लीटर पेट्रोलसाठी 107.20 रुपये आणि डिझेलसाठी 97.29 रुपये मोजावे लागत आहेत. पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी 67 टक्के तर डिझेलच्या तुलनेत 47 टक्के स्वस्त आहे.