मी लेखक नाही मात्र वाचक जरूर आहे, लेखकाच्या स्वातंत्र्यावर कुणी निर्बंध लादणार असेल तर त्याचा पहिला विरोध करणारा मी असेल - स्वागताध्यक्ष छगन भुजबळ
नाशिक : मी लेखक नाही मात्र वाचक जरूर आहे. लेखकाला लेखन स्वातंत्र्य असलेच पाहिजे या मताचा मी आहे. त्याच्यावर कुणी निर्बंध लादणार असेल तर त्याला पहिला विरोध करणारा मी असेन. लोकहितवादी मंडळ आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे उद्घाटन कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई, कृषी मंत्री दादाजी भुसे, प्रमुख पाहुणे जावेद अख्तर, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील,उदघाटक विश्वास पाटील, डॉ.दादा गोऱ्हे,रामचंद्र साळुंखे, खासदार श्रीनिवास पाटील, शुभांगीणी राजे गायकवाड, ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले, सदानंद मोरे, उत्तम कांबळे, लक्ष्मीकांत देशमुख, श्रीपाल सबनीस, हेमंत टकले, समीर भुजबळ, पंकज भुजबळ, जयप्रकाश जातेगावकर, विश्वास ठाकूर, प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, सुभाष पाटील, मिलिंद कुलकर्णी,प्राचार्य प्रशांत पाटील, संजय करंजकर, दिलीप साळवेकर, स्वानंद बेदरकर यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पालकमंत्री तथा स्वागताध्यक्ष छगन भुजबळ म्हणाले, साहित्य संमेलनाच्या इतिहासात नाशिकचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले जाईल अशी अजोड कामगिरी नाशिकने केली आहे. मुंबई येथे १९३८ मध्ये झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भूषविले होते आणि त्यांनी ‘लेखकांनी हातात लेखण्या न घेता बंदुका घ्या’ असा सल्ला तुम्हा मंडळींना दिला होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चळवळीला अनुलक्षूण सावरकरांनी साहित्य मंचावरून आपले विचार मांडले हे लक्षात येते. पुढील काळात संमेलनाध्यक्षपदाचा मान तात्यासाहेब शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांना लाभला. मराठी भाषेतले दुसरे ज्ञानपीठ त्यांना मिळाले आहे, हे मी आपणास सांगितले पाहिजे असे नाही. तात्यासाहेबांनी मडगाव,गोवा येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेची होणारी आबाळ सगळ्यांच्या लक्षात आणून दिली होती.
साहित्यकांबद्दल बोलताना स्वागताध्यक्ष छगन भुजबळ म्हणाले नाशिकचा माणूस दुसऱ्याला भरभरून देत असतो. उदारता हा नाशिककरांचा गुण आहे. त्या बळावरच आम्ही तुमचे स्वागत करीत आहोत. साहित्य संमेलनाची आखणी करताना आपल्याला राजाश्रय हवा असतो. शासनाने तो दिला पाहिजे असेच माझे मत आहे. तुम्ही मंडळी राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेऊन कथा, कादंबऱ्या रचत असता. वात्रटिकांसाठी राजकीय पुढाऱ्याइतका मसाला तुम्हाला कोणी पुरवत नाही. तरीसुद्धा साहित्य संमेलनाच्या मंचावर राजकीय नेत्याने असू नये असे काहींना वाटते, ते मला उचित वाटत नाही. तुम्ही तुमचे स्वातंत्र्य अबाधित ठेवा. ‘राज्यकर्त्यांनो तुम्ही चुकता आहात’ हे सांगण्याचा तुमचा अधिकार आम्ही मान्य करतो. मी एक वाचक आहे. सार्वजनिक जीवनात मी फुले-शाहु-आंबेडकरांच्या विचारांनी वाटचाल करीत असतो. महात्मा फुल्यांनी दुसर्या साहित्य संमेलनाचे निमंत्रण १८८५ साली नाकारले होते. त्यांचे म्हणणे होते की “साहित्यकारांनी जातीनिर्मुलनाची भूमिका घेतली पाहिजे.” ते म्हणत असत.
पुढे छगन भुजबळ म्हणाले, फुले म्हणायचे ” इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो.” आता लोक म्हणतात, “ईडीपिडा टळो आणि लोकशाही बलवान होवो” शाहु महाराजांचे नाशिकवर विशेष प्रेम होते. बाबासाहेबांनी नाशिकच्या दादासाहेब गायकवाडांना लिहिलेल्या पत्रांचा महाग्रंथ राज्य शासनाने २१ व्या खंडाच्या रुपाने प्रसिद्ध केलेला आहे. आमच्या नाशिकच्या महाराजा सयाजीरावांची कीर्ती त्रिखंडात गाजलेली आहे. त्यांनी सयाजी विजय मालेतून प्रकाशित केलेले बुद्धचरित्र वाचून बाबासाहेब बुद्धाकडे वळले. त्यांनी या मालिकेत प्रकाशित केलेली ३०० हुन अधिक पुस्तके पुन्हा प्रकाशित व्हायला हवीत असे माझे मत आहे. इतकी ती मोलाची आहेत. त्यांनीच १९०५ साली भारतात शिक्षण प्रथम सक्तीचे, सार्वत्रिक आणि मोफत केले. आधुनिक गुजरात सयाजीरावांनी घडवला, हे सांगताना मला अभिमान वाटतो.
महात्मा फुल्यांनी जाती निर्मूलनाचा विषय संमेलनात घेत नाही म्हणून या साहित्य संमेलनाचे निमंत्रण नाकारले होते. आज त्यांचा लहानसा अनुयायी छगन भुजबळ या मंचावरुन तुमचे स्वागत करतो आहे. हा बदल लक्षात तर घ्याल की नाही? नारळीकर- ठालेपाटील आणि भुजबळ एका मंचावर साहित्य सोहळा साजरा करीत आहेत. हा काळ आर्टीफिशियल इंटीलिजन्सचा आहे. आम्ही नाशिककरांनी तुमच्यासाठी सर्व स्वागताची तयारी केली आहे.
त्यातून कुठे काही उणे भासल्यास ते आमचे आहे. ते आमच्याकडे देऊन जा असे आवाहन देखील त्यांनी केले
साहित्य संमेलनाची सांस्कृतिक-साहित्यिक पर्वणी मनाला उभारी देणारी - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन म्हणजे आपल्या सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय. यंदाचे हे ९४ वे संमेलन नाशिकच्या पवित्र भूमीत आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या नगरीत साहित्य संमेलन होत आहे, याचा विशेष आनंद आहे. जगावर आलेले कोरोना महामारीचे संकट परतवून लावत असताना आता आपल्याला आपलं जगणं पुन्हा नव्या दमाने, जोमाने पूर्वपदावर आणायचे आहे. त्यासाठी साहित्य संमेलनाची ही सांस्कृतिक-साहित्यिक पर्वणी महत्त्वाची आणि मनाला उभारी देणारी ठरेल, असे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी साहित्य संमेलनानिमित्त दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
राज्याचे भाषा व उद्योग विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांचा शुभेच्छा संदेश या कार्यक्रमात वाचून दाखवला. या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, ‘माझा मराठीची बौलू कौतुके, परि अमृतातेही पैजा जिंके!’ असे सांगणाऱ्या विश्वमाऊली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीचे हे ७२५ वे म्हणजेच सप्तशताब्दी रौप्य महोत्सवी वर्ष आहे. मराठी भाषेचा विकास हा आपला सर्वांचाच ध्यास आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, शिक्षणातही मराठीला स्थान मिळावे असे आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहोत. मराठी केवळ भाषा नाही. ती संस्कृती आहे. या भूमिकेतून मराठी मुलुख एकत्र रहावा यासाठी महाराष्ट्रपुत्रांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत प्राणांची आहुती दिली. या हुतात्म्यांचे स्मरण करणेही आपले कर्तव्य आहे. या सर्व हुतात्म्यांना माझे त्रिवार वंदन.
यंदाचे संमेलन वैशिष्ट्यपूर्ण असे आहे. महाराष्ट्राने ज्ञान-विज्ञानाचा वसा प्रयत्नपूर्वक जतन केला आहे. मराठी साहित्य विश्वानेही मनोरंजन, विरंगुळा याच बरोबर वाचकांच्या जाणीवा प्रगल्भ करण्याची भूमिका जाणीवपूर्वक स्वीकारली आहे. समाजातील अनिष्ट प्रथा-परंपरावर प्रबोधनात्मक असा घाव घालण्याचे धारिष्ट्यही दाखवले आहे. असा वैज्ञानिक वारसा जपणाऱ्या वाटचालीत संमेलनाचे अध्यक्षपद जगद्वविख्यात खगोलशास्त्रज्ञ व विज्ञान साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर भूषवणार आहेत, ही अभिमानाची बाब आहे.
जगद्गगुरू संत तुकोबारायांच्या ‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. शब्दांची शस्त्रे यत्न करू. शब्दची आमुच्या जीवांचे जीवन’ या ओळींप्रमाणे हे अक्षरांचे अक्षय धन लुटण्यासाठी आपण दरवर्षी एकत्र येत असतो. या संमेलनाच्या संयोजनाचा मान दुसऱ्यांदा पटकावणारे नाशिककर गोदाकाठचा हा मेळा संस्मरणीय करतीलच. पण या संमेलनातून कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांसह, आपल्या लेखन प्रयोगांतून मराठीला आणखी समृद्ध, संपन्न करणाऱ्या ज्येष्ठ-श्रेष्ठ साहित्यिकांना मानवंदना दिली जाईल. यातून मराठीतील विविध साहित्यिक प्रवाहांतील नव्या दमाच्या प्रतिभावंताना प्रेरणा मिळेल. या सगळ्या प्रयत्नांतून नानाविध प्रतिभेचे, सर्जनशील असे अनेक लिहिते हात पुढे येतील अशी अपेक्षा आहे. साने गुरूजींच्या ‘..जगाला प्रेम अर्पावे’ असे सांगणाऱ्या या मराठीत विज्ञानेश्वर घडावेत, अभिरूची संपन्न महाराष्ट्र घडावा, हीच आकांक्षा आहे. संमेलनात प्रकाशित करण्यात येणाऱ्या मराठी विज्ञान साहित्याचा इतिहास या स्मरणिकेच्या प्रकाशनास तसेच संमेलनाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीला मनःपूर्वक शुभेच्छा या संदेशातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दिल्या साहित्य संमेलनाला शुभेच्छा
‘अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळा’चे 94 वे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ नाशिक येथे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, विज्ञानकथा लेखक आदरणीय डॉ. जयंत नारळीकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली होत असल्याचे समजून आनंद झाला. नाशिकच्या ‘लोकहितवादी मंडळा’च्या सहकार्यातून, जिल्ह्याचे पालकमंत्री, संमेलनाचे स्वागताध्यक्ष सन्माननीय श्री. छगन भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास उपस्थित सर्व सन्माननीय साहित्यिक, साहित्यरसिक बंधू-भगिनींचे सर्वप्रथम मी मन:पूर्वक स्वागत करतो. आडगावच्या भुजबळ ज्ञाननगर आवारात उभारलेल्या कवीवर्य कुसुमाग्रजनगरीत 3 ते 5 डिसेंबर 2021 पर्यंत चालणाऱ्या या संमेलनाच्या आयोजनात सहभागी सामाजिक, शैक्षणिक, वाचन व ग्रंथ चळवळीतील संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते बंधू-भगिनींचे अभिनंदन करतो. आभार मानतो. संमेलन यशस्वितेसाठी शुभेच्छा देतो.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ही आपली गौरवशाली सांस्कृतिक परंपरा आहे. जगभरातील मराठी साहित्यिक, मराठी भाषा प्रेमींसाठी संमेलन ही आनंदपर्वणी असते. आपल्या आवडत्या साहित्यिकांना भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी यानिमित्तानं रसिकांना उपलब्ध होत असते. साहित्य क्षेत्रातील घडामोडींचा वेध घेत भविष्यातील वाटचालीची आखणी केली जाते. साहित्य चळवळीला दिशा, ऊर्जा देण्यात संमेलनं महत्त्वाची भूमिका बजावत असतात. साहित्यसंवाद, कथाकथन, कवीसंमेलनं, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून स्थानिक, नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचं काम संमेलनाच्या माध्यमातून होतं. साहित्य संमेलनाध्यक्षांचं भाषण हे नेहमीच आकर्षणाचं केंद्र राहीलं आहे. राज्याच्या, देशाच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वाटचालीला दिशादर्शन करण्याची ताकद संमेलनाध्यक्षांच्या भाषणात असते. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, विज्ञानकथा लेखक डॉ. जयंत नारळीकर हे संमेलनाध्यक्ष असल्याने त्यांचे विचार महाराष्ट्राच्या साहित्य चळवळीला विज्ञानवादाकडे नेणारे ठरतील, हा विश्वास आहे.
मराठी भाषा प्राचीन, साहित्यश्रेष्ठ आहे. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू सारख्या ग्रंथांनी मराठी भाषा बाराव्या शतकाच्या आधीपासून अस्तित्वात असल्याचे सिद्ध केले आहे. तद्नंतर साहित्यिकांच्या प्रत्येक पिढीनं आपल्या साहित्यकृतीनं मराठी भाषा समृद्द करण्यात मोलाचं योगदान दिलं. साहित्यिक वि. स. खांडेकर, कवीवर्य कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे यांनी मराठीला ज्ञानपीठ पुरस्कारानं अलंकृत केलं. लाडकं व्यक्तिमत्वं पु. लं. देशपांडे यांनी महाराष्ट्र कायम हसत ठेवला. कवयित्री शांता शेळके, बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यकृतींनी स्त्रीसाहित्याचा झेंडा उंच केला. प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुरोगामी, विज्ञानवादी, विचारांनी मराठी साहित्याला नवी दृष्टी दिली. गेल्या काही दशकात महाराष्ट्राच्या गावखेड्यातून, वाड्या-तांडे-वस्त्यांवरुन तिथल्या जगण्याशी, भाषा-बोलींशी नातं सांगणारे युवा साहित्यिक पुढे आले. त्यांनी त्यांच्या अनुभवातून, बोलीतून मराठी साहित्यरसिकांना वेगळं जग दाखवलं. महाराष्ट्राचं अंतरंग साहित्यकृतीतून मांडणारे अनेक साहित्यिक आज राज्याच्या गावखेड्यात लिहिते झाले आहेत. आपापल्या परीनं मराठी भाषा समृद्ध करीत आहेत. या ग्रामीण युवा साहित्यिकांचं मी विशेष अभिनंदन करतो. महाराष्ट्राच्या गावखेड्यातल्या ग्रामजीवन बोलीभाषेतून साहित्यबद्ध करण्याचा वसा या युवा साहित्यिकांनी कायम ठेवावा, असं आवाहन करतो.
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यापासून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक सुधारणांच्या प्रत्येक लढ्याचं नेतृत्वं महाराष्ट्रानं केलं आहे. हे लढे लढण्यात, पुढे नेण्यात मराठी साहित्यिक व साहित्य चळवळ कायम अग्रस्थानी होती. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ यशस्वी करण्यात साहित्यिकांचं अनन्यसाधारण योगदान आहे. समाजातील अनेक महत्वाच्या मुद्यांवर मराठी साहित्यिकांनी यापूर्वी आपली मते वेळोवेळी मांडली आहेत. तो स्पष्टवक्तेपणा अलिकडे अभावाने दिसतो. साहित्यिकांनी महत्वाच्या मुद्यांवर ठोस भूमिका घेऊन विचार मांडावेत. समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी कृतीशील व्हावे, ही नागरिकांची, साहित्यरसिकांची अपेक्षा असते. अलिकडच्या काळात साहित्यिक मंडळी कुठल्याही विषयावर व्यक्त होताना दिसत नाहीत. व्यक्त होणं जाणीवपूर्वक टाळलं जातं. ही बाब लोकशाहीसाठी हानीकारक, साहित्य रसिकांचा अपेक्षाभंग करणारी आहे. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी साहित्यिकांना विविध विषयांवर व्यक्त व कृतीशील करण्याचे प्रयत्न होतील. मराठी भाषेला विज्ञानवादाकडे नेले जाईल. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी कार्यक्रम आखला जाईल, सीमाभागातील मराठीभाषक गावांच्या महाराष्ट्रात सामील होण्याच्या लढ्याला बळ देण्याचं काम होईल. संमेलन तीन दिवसांचे असले तरी मराठी भाषेचा गौरव वाढवण्यासाठी आपण वर्षभर प्रयत्नशील राहू, अशी अपेक्षा व्यक्त करतो. 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्तानं सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद… अजित पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
जगात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषेत माय मराठीचाही समावेश आहे - उद्घाटक विश्वास पाटील
नाशिक ही गुणवंताची, बुध्दीवंतांची भूमी असून साहित्याच्यादृष्टीने रत्नांची खाण आहे. जगात सर्वात जास्त ज्या दहा भाषा बोलल्या जातात. त्यात आमची माय मराठी आहे असे प्रतिपादन संमेलनाचे उदघाटक व साहित्यिक विश्वास पाटील यांनी यावेळी केले. त्या भाषेचे शेक्सपिअर वि. वा. शिरवाडकर हे होते. त्यांचे विशाखा हे महाकाव्य होते. जिल्ह्यातील विविध साहित्यिकांची उदाहरण देताना तात्यासाहेब हे माझे अजिंठा होते तर कानेटकर हे वेरूळ होते .असे सांगून पानिपत लिहिल्यानंतर तात्यासाहेब ती मी ज्या टेबलावर लिहिली त्याचे अवलोकन करण्यासाठी ते मिरजेत आले होते असे सांगून त्यांनी शिवरायांच्या स्मृती जपल्या पाहिजेत अशी अपेक्षाही व्यक्त करून यारी आणि दिलदारीमध्ये नाशिकचा हात कोणीही धरणार नाही असेही ते म्हणाले.
संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकरांनी दुरदृष्यप्रणालीद्वारे व्यक्त केले मनोगत
सर्वप्रथम आजच्या महत्वाच्या प्रसंगी मला माझे विचार मांडायला संधी दिलीत याबद्दल आपणा सर्वांचे आभार मानतो. तसेच माझे भाषण आपल्या पसंतीस उतरले नाही तर त्याबाबत आधीच दिलगिरी व्यक्त करतो.
कुठल्याही भाषेतले साहित्य ती भाषा वापरणाऱ्या समाजातील घडामोडींनी प्रभावित झालेले असते. साहित्याचा कोणताही विषय असो, ते लिहिणारा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीपासून अलिप्त राहू शकत नाही. एखाद्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत “ह्या पुस्तकातील घटना व पात्रे काल्पनिक असून त्यांचा प्रत्यक्षाशी काहीही संबंध नाही.” इत्यादी विधाने सापडतात. त्यांनी कायद्याचे समाधान होत असेल, पण लेखकाने आत्मपरीक्षण केल्यास त्याला अशा विधानात तथ्य नसल्याचे आढळून येईल. परंतु याचा अर्थ असा नव्हे की , सामाजिक घडामोडींचे संपूर्ण प्रतिबिंब साहित्यात उमटते. एखादी भाषा पुष्कळ विकसित असेल तर समाजाचे बहुतेक पैलू त्यात उमटतात. परंतु काही महत्त्वाचे पैलू भाषेकडून उपेक्षिले गेले तर त्या बाबतीत तिला असमृद्ध समजले पाहिजे. अशा मानदंडाद्वारे आपण असे म्हणू शकतो की, इंग्रजी भाषा मराठी भाषेपेक्षा अधिक समृद्ध आहे.
मराठीचे अपूर्णत्व सर्वांत जास्त जर कुठे जाणवत असेल तर ते विज्ञान – साहित्याबाबतीत. विसावे शतक हे विज्ञानाचे शतक म्हटल्यास चूक ठरणार नाही. आइन्स्टाइनचा सापेक्षतावाद आणि प्लांक – आइन्स्टाइन बोर यांचा पुंजवाद हे दोन महत्त्वाचे मूलभूत सिद्धान्त ह्या शतकाच्या पहिल्या पंधरा वर्षात भौतिकशास्त्राला मिळाले. अमूर्त गणिताच्या अनेक नव्या शाखा ह्या शतकात चालू झाल्या. वर्षानुवर्षे न सुटू शकणारे प्रश्न चुटकीसरशी सोडवणारी गणकयंत्रे ह्या शतकाच्या उत्तरार्धात निघाली. विश्वाचे विराट दर्शन आणि अणूच्या अंतरंगाचे सूक्ष्म दर्शन मानवाला आज पाहायला मिळत आहे. जीवशास्त्राच्या मुळाशी असलेला डी.एन.ए. रेणू शास्त्रज्ञांना सुमारे सहा दशकांपूर्वी गवसला. विज्ञानाची ही गरुडझेप तंत्रज्ञानाच्या रूपाने मानवीजीवन अधिक प्रगत, विकसित करायला कारणीभूत ठरली .
– जयंत नारळीकर,संमेलनाध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक
साहित्य समंलेनाच्या माध्यमातून सर्व भाषा एकत्र आल्या पाहिजेत - जावेद अख्तर
भाषेमुळे संवादातील अडथळे दूर होतात. संस्कृती जोपासण्यासाठी भाषा हि सेतू सारखे काम करते, साहित्य संमेलनाच्या माध्यमातून सर्व भाषा व प्रादेशिक भाषा एकत्र आल्या पाहिजेत. जो जनतेशी संवाद साधतो तोच खरा मोठा लेखक असून, मराठी भाषा हि अत्यंत समृद्ध वारसा लाभलेली भाषा असून देशातील पहिल्या महिला डॉक्टरही मराठी आहे असे नमूद करून साहित्यिकांनी प्रामाणिपणे काम केले पाहिजे असे आपल्या मनोगतात यावेळी प्रसिद्ध साहित्यिक, पटकथाकार, लेखक व कवी जावेद अख्त्तर यांनी यावेळी केले.