मुंबई : शहरात ई-चलान भरण्यासाठी उपलब्ध असलेल्या QR कोडचा गैरवापर करून नागरिकांना आर्थिक फसवणूक करण्याच्या तक्रारी वाढत आहेत. अशाच प्रकारची एक गंभीर घटना मुंबईतील बायकळा विभागात घडली असून याबाबत श्री. राजेंद्र कैलास निकम यांनी वाहतूक विभागाकडे तसेच पोलीस आयुक्तांकडे तक्रार नोंदवली आहे.
तक्रारदाराच्या MH01-DR-6544 या वाहनावर 19/10/2025 ते 21/10/2025 या कालावधीत ई-चलान लागले होते. सरकारी पोर्टलवर उपलब्ध असलेल्या QR कोडद्वारे चालान भरल्याचे समजत असताना, रक्कम अधिकृत शासकीय खात्यात न जाता तृतीय पक्षाच्या संशयास्पद खात्यावर जमा झाल्याचे उघड झाले. या QR कोडमार्फत 2000 रुपयांची रक्कम भरली गेली होती.
तक्रारदाराने केलेल्या चौकशीत उघड झाले की ई-चलान भरण्यासाठी दिसणारा QR कोड सरकारी नसून तो कसा आणि कोणी बदलला याबाबत शंका आहे.
या प्रकरणाची माहिती वाहतूक नियंत्रण शाखेला देताच, त्यांनी तक्रारदाराची तक्रार स्वीकृत करून संबधित शाखेकडे पुढील तपासासाठी पाठवली आहे. अधिकृत पत्रानुसार, तक्रार क्रमांक 3299/2024 नुसार पुढील चौकशी सुरू आहे.
दरम्यान, अशा प्रकारच्या QR कोड घोटाळ्यांबाबत ‘सकाळ’ दैनिकातही दोन हजारांहून अधिक तक्रारींचा उल्लेख करण्यात आला आहे. ई-चलान पोर्टल, वाहन विभाग, तसेच स्कॅन-टू-पे प्रणालीमध्ये सुरक्षेतील त्रुटींचा मुद्दा सर्वसमोर येत असून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
तक्रारदारांनी पुढील कारवाई म्हणून QR कोडची शहानिशा, सायबर तक्रार आणि अशा घोटाळ्यांपासून नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.









