लोकायुक्ताच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष…
प्रतिनिधी मुंबई :
मुंबई महानगरपालिकेच्या १० रुग्णालयांमध्ये (राजावाडी, कुर्ला भाभा इ.) साफसफाईसाठी नेमलेल्या नामांकित खाजगी कंत्राटदाराने नेमलेल्या साफ सफाई कामगारांना किमान वेतन न देता फक्त ₹१०,५०० मासिक पगार दिल्याचे धक्कादायक वास्तव माहिती अधिकारातून उघड झाले आहे. ही माहिती RTI कार्यकर्ते आणि राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती चे मुंबई महासचिव आदित्य मैराळे यांना प्राप्त झाली होती.
मुख्य मुद्दे-
कायदेशीर वेतनापेक्षा कमी पगार – प्रमुख कामगार अधिकारी , कामगार विभाग यांच्या रोजगार दर परिपत्रकानुसार आवश्यक किमान वेतन व बोनस न देता कामगारांची फसवणूक झाल्याचे बँक स्टेटमेंट मधून उघड तर भविष्य उदरनिर्वाह निधी बाबतही शंका.
मुख्य नियोक्ता म्हणून जबाबदारी – कंत्राटी कामगार कायदा २१(४) नुसार कंत्राटदाराने कामगारांना वेतन न दिल्यास किंवा कमी दिल्यास मुख्य नियोक्ता म्हणून महानगरपालिकेवरच फरकाची रक्कम चुकती करण्याची जबाबदारी.
विधी विभागाचा संशयास्पद प्रतिसाद – सहाय्यक कायदा अधिकाऱ्यांनी स्वतःचे नाव लपवून दिलेल्या पत्रात अधिकारी जबाबदार नाहीत शिवाय कंत्राटदाराची पाठराखण केली, कामगारांच्या पगार पावत्या नाकारल्या कामगारांनी प्रत्यक्ष तक्रार केल्यास दंडात्मक कारवाई करू असे मनमानी उत्तर.
प्रश्न उपस्थित – कायद्याचे पालन करण्यासाठी कामगारांच्या तक्रारीची आवश्यकता का? कंत्राटी कामगार कायदा कलम २१(२) नुसार नियमाप्रमाणे वेतन दिले जाते की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी नेमणे आवश्यक तसेच मुख्य नियोक्त्याने स्वतः तपासणी करून पगार फरकाची रक्कम चुकती करणे आवश्यक शिवाय कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी. कारवाईत टाळाटाळ करण्यामागे शंका निर्माण होत आहे.
शिस्तभंगाची मागणी – आयुक्त, खाते प्रमुख (मा.आरोग्य), १० रुग्णालयातील रुग्णालय प्रमुखांसह लेखा अधिकारी व लेखा परीक्षक अशा एकूण ३० अधिकाऱ्यांवर शिस्तभंग व बडतर्फीची कारवाई करण्याची लोकायुक्तांकडे मागणी.
अंदाजे नुकसानभरपाई
योग्य कारवाई झाल्यास १०८ कंत्राटी साफसफाई कामगारांना प्रत्येकी ₹२ ते २.५ लाखांपर्यंत फरकाची रक्कम मिळण्याची शक्यता आहे.
लोकायुक्तांकडे तक्रार
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, शासनाच्या अखत्यारित येणाऱ्या या संस्थेकडून न्यायिक कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.