बुलढाणा प्रतिनिधी –
शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी, त्यांनी आत्महत्या टाळाव्यात म्हणून शासन विविध योजना राबविते. मात्र, याच योजनांचा गैरवापर करून काही भ्रष्ट शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदार संगनमताने कोटींची कमाई करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा (GSDA) बुलढाणा अंतर्गत तालुका मोताळा येथील मौजे दाभा, ऊबळखेड, गुळभेली, राहेरा व खामखेड या गावांमध्ये सन २०२३-२४ मध्ये अटल भुजल योजनेअंतर्गत नाला खोलीकरण व रिचार्ज शाफ्ट कामे प्रत्यक्षात न करता देयके काढण्यात आली असल्याचे समोर आले आहे.
या प्रकारामुळे संतप्त ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी बुलढाणा, उपसंचालक (भु. स. वि. यं.) अमरावती, तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांच्याकडे तोंडी व लेखी तक्रार नोंदवली. मात्र, आजतागायत कोणतीही चौकशी सुरू करण्यात आलेली नाही.
गावकऱ्यांनी माध्यमांपर्यंत आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न केला असता, त्याकडेही दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या घोटाळ्यामागे राजकीय, शासकीय व प्रशासकीय पातळीवर मोठा दबाव असल्याचा संशय ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.
👉 ग्रामस्थांची मागणी :
रखडलेली कामे तात्काळ पूर्ण करावीत.
दोषी अधिकारी, कर्मचारी व ठेकेदार यांच्यावर फौजदारी कारवाई करावी.
संबंधितांना कायमस्वरूपी निलंबित करावे.
ग्रामस्थांचा ठाम इशारा आहे की शासनाने तातडीने लक्ष घालावे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल.