कंपनीच्या नावामध्ये का बदल करण्यात आलाय? याचा कंपनीकडून पुरवल्या जाणाऱ्या सेवांवर काय परिणाम होणार? या आणि इतर प्रश्नांची माहिती झुकरबर्गने दिलीय
जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग कंपनी असणाऱ्या फेसबुकने आपलं नाव बदललं आहे. रिब्रॅण्डींगच्या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे. फेसबुक कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्गने यासंदर्भातील घोषणा केली आहे. कंपनीच्या वार्षिक सभेमध्ये बोलताना आता कंपनी जी कामं करतेय ती सर्व फेसबुक या नावाखाली योग्य वाटत नसल्याने कंपनीने मूळ कंपनीचं म्हणजेच पॅरेंट कंपनीचं नाव बदलण्याचा निर्णय घेतल्याचं झुकरबर्ग म्हणाला आहे. झुकरबर्गने आता आपण मेटाव्हर्स पद्दतीने उत्पादने निर्माण करुन वापरकर्त्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हे नाव बदलत असल्याचे सांगितलं आहे. फेसबुकचं नवं नाव मेटा असं असेल.
मेटाव्हर्स म्हणजेच व्हर्चूअल विश्वाला अधिक प्राधान्य देण्याची भूमिका. इंटरनेटच्या माध्यमातून लोक जेव्हा व्हर्चूअल विश्वामध्ये भ्रमंती करतात त्याला मेटाव्हर्स असं म्हणतात. यामध्ये डिजीटल स्पेसचाही समावेश होतो. डिजीटल स्पेस म्हणजेच व्हर्चूअल रिअॅलिटी आणि ऑगमेन्टेट रिअॅलिटीसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उभं केलेलं आभासी जग. याच आभासी जगाला डिजीटल स्पेस असं म्हटलं जातं. स्क्रीनवर टाइप करण्यापासून सुरुवात करत आज आपण मोबाईपर्यंत येऊन पोहचलोय. सध्या आम्ही जे काम करतोय त्यासाठी फेसबुक हे नाव पुरेसं आणि सर्वसामावेशक वाटत नाही. म्हणूनच यापुढे आम्ही मेटा या नावाने ओळखले जाणार आहोत, असं मार्क झुकरबर्ग म्हणाला आहे.
सध्या फेसबुक या ब्रॅण्डखाली या कंपनीच्या उप कंपन्या आहेत. यामध्ये खास करुन फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप, ऑक्युलस आणि इतर कंपन्यांचा समावेश आहे. हे नामकरण करताना सध्या असणाऱ्या सेवा आणि अॅपची नावं बदलली जाणार नाहीत असं मार्क झुकरबर्गने स्पष्ट केलं आहे. म्हणजेच अगदी साध्या शब्दात सांगायचं झाल्यास फेसबुकने केलेला बदल हा पूर्णपणे व्यवसायिक असून वापरकर्त्यांवर म्हणजेच त्यांची सेवा वापरणाऱ्यांवर सध्या तरी काही मोठा परिणाम होणार नाहीय. या पुढे आम्ही सर्व कारभार हा फेसबुक फर्स्ट धोरणाऐवजी मेटाव्हर्स फर्स्ट या भूमिकेमधून करणार आहोत. यासंदर्भात मार्क झुकरबर्गने फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट लिहिली आहे.
केवळ नावच नाही तर कंपनीने आपला लोगोही बदलला आहे. आता फेसबुकच्या एफऐवजी इन्फीन्टीचं चिन्हं हे कंपनीचा लोगो असणार आहे. या चिन्हामधून आणि नवामधून फेसबुकने माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अमर्याद शक्यता आणि त्यावरील संशोधन आता याच ब्रॅण्डनेमखाली केलं जाणार असल्याचे संकेत दिले आहेत.
मेटा या ब्रॅण्डनेमअंतर्गत प्रामुख्याने दोन गोष्टींमध्ये काम केलं जाईल. पहिलं म्हणजे सध्या ज्या सेवा पुरवल्या जातात त्यांचं आणि दुसरं भविष्यातील तंत्रज्ञान आणि संशोधनासंदर्भातील असणार असं झुकरबर्गने म्हटलं आहे.