पंतप्रधान मोदींच्या ‘परीक्षा पे चर्चा’ वर खर्च झाले २८ कोटी; शिक्षण मंत्रालयाची माहिती
नवी दिल्ली :- नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम पार पडला होता. मोदींच्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या प्रत्येक समस्येला मोदींनी उत्तर दिले होते.मोदींच्या या कार्यक्रमावर विरोधी पक्षातील नेत्यांनी टीकेची झोडदेखील उठवली होती. मात्र, आता या कार्यक्रमाच्या खर्चाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
मोदींच्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमांतर्गतील पाच कार्यक्रमांवर आतापर्यंत २८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आज सोमवारी दिली.
लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी सांगितले की, २०१८ मध्ये ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमावर ३.६७ कोटी रुपये, २०१९ मध्ये ४.९३ कोटी रुपये, २०२० मध्ये ५.६९ कोटी रुपये, २०२१ मध्ये ६ कोटी तर, २०२२ मध्ये ८.६१ कोटी खर्च झाल्याचे देवी यांनी यावेळी सांगितले. २०२१ मध्ये कोरोना महामारीमुळे या कार्यक्रमाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी विक्रमी ३८ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी जवळापास १५ लाखांनी वाढल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे.